पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – रस्त्यावर कार आडवी का घातली याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन इसमांनी एका दुचाकीस्वाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात दुचाकीस्वाराच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. ही घटना शुक्रवारी (१ मे) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई हायवेवर देहूरोड येथील सेक्शन हॉस्पिटलसमोर घडली.
रोहीदास शांताराम जाधव (वय ४८, रा. शेलारवाडी, ता. मावळ, जि. पुणे) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी रविवारी (दि. ३ मे) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नरेंद्र अशोक मुरुडकर (रा. धायरीगाव, पुणे) आणि त्याचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी जाधव हे त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून देहूरोडहून शेलारवाडीला जात होते. ते जुन्या पुणे-मुंबई हायवेवर देहूरोड येथील सेक्शन हॉस्पिटलसमोर आले असता त्यावेळी आरोपीने आपली सँट्रो कार (एमएच 12 सीवाय 3455) अचानक डिव्हायडर क्रॉस करून हायवेवर आणली. फिर्यादीने गाडी अचानक मध्ये का घातली असा जाब विचारला असता, कारमधील दोघांनी खाली उतरून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. यातील एकाने फिर्यादीच्या नाकावर जोरात बुक्का मारल्याने त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
जाब विचारल्याने केलेल्या मारहाणीत दुचाकीस्वाराच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर
