बारामती पुन्हा तापमानात अव्वल; घट झाली तरी ‘हॉट’ ट्रेंड कायम

पिंपरी-चिंचवड ः मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुणे जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून, तापमानात किंचित घट होऊनही बारामतीने पुन्हा एकदा ‘सर्वाधिक तापमान’चा मान पटकावला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात कडक उन्हाचा तडाखा कायम असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
आज नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, बारामती येथे ३८.४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले. मागील दिवसांच्या तुलनेत थोडी घट झाली असली तरी, बारामती जिल्ह्यात सर्वाधिक तापमानावर कायम आहे. त्यापाठोपाठ पुणे शहरातील शिवाजीनगर येथे ३७.४°C, तर दौंड येथे ३६.९°C तापमानाची नोंद झाली.
पिंपरी-चिंचवड परिसरातही उष्णतेचा तडाखा कायम असून चिंचवड येथे ३६.२°C तापमान नोंदवले गेले. हवेली (३६.५°C), पाषाण (३५.९°C) आणि राजगुरुनगर (३५.७°C) येथेही उन्हाचा जोर कायम आहे. हडपसर, तळेगाव आणि शिरूर या भागांत तापमान ३४ ते ३५ अंशांच्या दरम्यान राहिले.
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथे जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजे ३२.५°C तापमानाची नोंद झाली. डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे या भागात तुलनेने दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता, पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि थेट उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एकूणच, तापमानात किरकोळ घट झाली असली तरी उष्णतेचा ‘ट्रेंड’ कायम असून पुढील काही दिवस जिल्ह्यात कडक उन्हाचीच स्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *