पिंपरी–चिंचवड ः आरटीई अंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक, ऑनलाइन आणि विनामूल्य असल्याचे स्पष्ट करत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अलीकडे काही ठिकाणी प्रवेशाच्या नावाखाली पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रशासनाने हा इशारा दिला आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरटीई प्रवेश प्रक्रिया ही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आधारित असून अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, संगणकीय लॉटरी आणि प्रवेश निश्चिती हे सर्व टप्पे ऑनलाइन पद्धतीने होतात. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या एजंट किंवा मध्यस्थाची आवश्यकता नसते. त्यामुळे प्रवेशासाठी पैसे देण्याची कोणतीही गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काही व्यक्ती स्वतःला शाळेशी किंवा शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचे भासवून पालकांना आमिष दाखवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे पैसे मागणे हे पूर्णतः बेकायदेशीर असून पालकांनी अशा फसवणुकीपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार असून तो कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी जोडलेला नाही. पालकांनी सजग राहून गैरप्रकारांना बळी पडू नये,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
“प्रवेश प्रक्रिया पूर्णतः संगणकीकृत असून कोणत्याही मध्यस्थीला स्थान नाही. पैसे मागणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.
उपायुक्त ममता शिंदे यांनीही पालकांनी अधिकृत पोर्टलवरूनच अर्ज करावा आणि कोणत्याही आमिषांना बळी पडू नये, असे स्पष्ट केले आहे.
पालकांनी संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरटीई प्रवेश पूर्णतः विनामूल्य पालकांनी दलालांपासून सावध राहावे – महापालिकेचा इशारा
