हॉटेलमध्ये जेवण मागणाऱ्या ग्राहकावर जीवघेणा हल्ला

पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – वेटरने जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून एका ग्राहकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (४ मे) रात्री २ वाजेच्या सुमारास पिंपरीतील साई चौक परिसरात असलेल्या हॉटेल रौनक बाहेर घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
अशिष जगन्नाथ वाळुंज (वय ३०, रा. नेहरुनगर पिंपरी) असे जखमी ग्राहकाचे नाव असून त्‍यांनी सोमवारी (दि. ४ मे) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्बास असादुन शेख (वय ३०, रा. पिंपरी), मोहंमद अजिज आशान शेख (वय २१, रा. पिंपरी) आणि पंकज ऊर्फ बंटी शंकर भुमकर (वय ३०, रा. बौध्दनगर, पिंपरी) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करून पोलिसांनी त्‍यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र सोमवारी पहाटे दोन वाजताच्‍या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेल बंद झाल्याचे वेटरने जोरात ओरडून सांगितल्याने फिर्यादीने त्याला नीट बोलण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी स्वयंपाक करण्याच्या झाऱ्याने आणि इतर वस्तूंनी फिर्यादीला मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच आरोपीने हातातील झारा हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *