विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता; नव्या शैक्षणिक वर्षात ७६ दिवस सुट्ट्या २०२६-२७ वेळापत्रक जाहीर; उन्हाळ्यात शाळांच्या वेळेत बदल

पिंपरी, दि. ४ मे (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना वर्षभरात तब्बल ७६ दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. शिक्षण आणि विश्रांती यांचा समतोल राखण्यावर भर देण्यात आला आहे.
नव्या नियोजनानुसार एकूण २३९ कार्यदिवस असणार आहेत. उर्वरित ७६ दिवस शाळा बंद राहतील. जिल्हा परिषद तसेच खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना हे वेळापत्रक लागू राहणार आहे. उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्यांचा यात मोठा वाटा आहे.
उन्हाळी सुट्टी २ मेपासून सुरू होऊन १४ जूनपर्यंत राहणार आहे. त्यानंतर १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू होतील. दिवाळी सुट्टी २ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान असेल. २० नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू होतील.
दरम्यान, वाढत्या तापमानाचा विचार करून शाळांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. १६ मार्च ते ३० एप्रिल या काळात शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत भरतील. श्रावण महिन्यात मराठी माध्यमाच्या शाळांसाठीही हीच वेळ राहील. रमजान काळात उर्दू माध्यमाच्या शाळांसाठीही सकाळची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
स्थानिक सणांच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. नागपंचमी, पोळा, गौरीपूजन आणि राजमाता जिजाऊ जयंतीसाठी सुटी जाहीर करता येणार आहे. मात्र, त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची मंजुरी आवश्यक असेल.
शिक्षण विभागाने २१ सुट्ट्या निश्चित केल्या आहेत. विभागीय स्तरावर २ दिवस आणि मुख्याध्यापकांकडे २ दिवसांचे अधिकार आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य जपत शैक्षणिक गुणवत्ता टिकवणे, हेच या वेळापत्रकाचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *