दुर्गादेवी टेकडी परिसरात बिबट्याचा थरार; सीसीटीव्हीमध्ये दर्शन! ​वनविभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

​पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहराच्या लगत असलेल्या दुर्गा देवी टेकडी, देहूरोड आणि रावेत परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. अमुनिशन फॅक्टरी, दुर्गा देवी टेकडी आणि म्हस्के वस्ती भागात बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

​यावेळी अफवा नाही, पुरावा मिळाला!
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागात बिबट्या असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमुनिशन फॅक्टरी आणि लगतच्या वनक्षेत्रात बिबट्या फिरताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वनविभागाची पथके सध्या या परिसरात बिबट्याचा माग काढत आहेत.

​चिखली परिसरातही झाला होता दावा
गेल्या आठवड्यात चिखली येथील चिंचेचा मळा परिसरात एका महिलेने बिबट्या पाहिल्याचा दावा केला होता. त्या वेळी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला होता. आता पुन्हा दुर्गादेवी टेकडी परिसरात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा परिसर रहिवासी वस्तीला जवळ असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

​शहरात पुन्हा बिबट्याची एन्ट्री?
पिंपरी-चिंचवड शहरात यापूर्वी देखील दोन वेळा बिबट्या शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या वेळी वनविभागाने अत्यंत जोखमीचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्यांना जेरबंद केले होते. आता पुन्हा एकदा तोच धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी समूहाने राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

​वनविभागाच्या सूचना:
– ​रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे.

– ​घराचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि पुरेसा उजेड ठेवावा.

– ​लहान मुलांना एकटे सोडू नये.

– ​बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *