एन्काऊंटरच्या धास्तीने मुख्य सूत्रधार न्यायालयात हजर!

​भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी खून प्रकरण : ‘फेक एन्काऊंटर’ची भीती व्यक्त करत आफताब शेखचे शरणागती

​पिंपरी :
भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी खून प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांकडून एन्काऊंटर होण्याची भीती वाटल्याने यातील मुख्य संशयित आफताब समीर शेख सोमवारी (दि. ४) थेट वडगाव मावळ न्यायालयात हजर झाला. पोलिसांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत त्याने न्यायालयात संरक्षणाची मागणी केली आहे.

​पूर्ववैमनस्यातून झाला होता खून
देहूरोड परिसरात २८ एप्रिल रोजी रमेश गुरूस्वामी रेड्डी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खुनामागे जुन्या वादाची किनार आहे. रमेश यांचा भाऊ विक्रम रेड्डी याची १३ फेब्रुवारी २०२५ रोजी हत्या झाली होती. या प्रकरणात आफताबची आई आणि भाऊ सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनाला रमेश रेड्डी यांचा कडाडून विरोध होता. याच रागातून आफताबने रमेश यांचा काटा काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

​नऊ दिवसांपासून होता फरार
रमेश रेड्डी यांच्यावर २१ हून अधिक गोळ्या झाडून आफताब फरार झाला होता. पिंपरी चिंचवड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके त्याचा शोध घेत होती. दरम्यान, काही सहकाऱ्यांना अटक झाल्याचे समजताच आफताबने वकिलांमार्फत हालचाली सुरू केल्या. त्याने आधी पुणे न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव तो अर्ज नामंजूर झाला. अखेर त्याने सोमवारी वडगाव मावळ न्यायालयात आत्मसमर्पण केले.

​’फेक एन्काऊंटर’चा गंभीर आरोप
न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात आफताबने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “मला दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असे मला समजले आहे. पोलीस माझा फेक एन्काऊंटर करू शकतात,” अशी भीती त्याने व्यक्त केली. न्यायप्रक्रियेच्या विरुद्ध जाऊन पोलीस कारवाई करण्याची शक्यता असल्याने मला तात्काळ न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी विनंती त्याने अर्जातून केली.

​पोलीस घेणार ताबा
आफताबची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांना त्याची कोठडी हवी आहे. त्यासाठी पोलिसांनी मंगळवारी (दि. ५) न्यायालयात रीतसर अर्ज सादर केला आहे. आज, बुधवारी (दि. ६) पोलीस आफताबला ताब्यात घेण्याची शक्यता असून, या खुनातील अन्य धागेदोरे समोर येण्याची अपेक्षा आहे.

​सूडाचा प्रवास: भावाच्या खुनाचा बदला आणि जामिनाला विरोध केल्याने हत्या.

​थरार: रात्रीच्या वेळी पाळत ठेवून २१ गोळ्या झाडल्या.

​धमकी: “आई-भावाला जामीन मिळाला नाही तर सर्वांना मारू” अशी तीन महिन्यांपूर्वीच दिली होती धमकी.

​कायदेशीर पेच: पुणे न्यायालयात अर्ज फेटाळल्यानंतर मावळ न्यायालयात धाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *