प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणावर हल्ला

पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – जवळच्‍या नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून भोसरी येथे एका तरुणाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १० मे) रोजी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास राम मंदिर हायस्कूल जवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली.
याप्रकरणी शुभम भगवान दुतोंडे (वय २२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी; मूळ रा. मलकापूर, बुलढाणा) यांनी सोमवारी (दि. ११ मे) रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बंटी गायकवाड, सुमित शिंदे, पप्पू गायकवाड आणि आदित्य सावद (सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम हा घरासमोर बसलेला असताना आरोपी तिथे आले. आरोपी पप्पू गायकवाड याच्या जवळच्‍या नातेवाईक महिलेशी शुभमचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. या रागातून त्यांनी शुभमला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी, दांडक्याने आणि तेथे पडलेल्या दगडाने मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *