पिंपरी-चिंचवडमध्ये रोजगाराची मेगा संधी; उद्या पिंपळे गुरवमध्ये भव्य जॉब फेअर ​टाटा मोटर्स, कमिन्स, फोर्स मोटर्ससह नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती; तरुणांमध्ये उत्साह

पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – नोकरीच्या शोधात असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंपळे गुरव येथे १४ मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा गुरुवारी, १४ मे रोजी नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल, समर्थ नगर येथे होणार आहे. एसबीआय बँकेसमोरील शाळेच्या परिसरात सकाळपासूनच उमेदवारांची गर्दी अपेक्षित आहे.
या रोजगार मेळाव्यात ऑटोमोबाईल आणि उत्पादन क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्या सहभागी होणार आहेत. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल, कमिन्स इंडिया, फोर्स मोटर्स, हुंदाई मोटर्स इंडिया यांसह विविध उद्योगांमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या जागेवरच वॉक-इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहेत.
एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. विविध शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उमेदवारांनी मेळाव्याला येताना शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडेटा किंवा रिझ्युमेच्या किमान दहा प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रिक्त पदांची माहिती आणि ऑनलाइन नोंदणीसाठी उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ०२०-२६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त सु.रा. वराडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *