पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – महाळुंगे येथे अपघातात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करून परतलेल्या तरुणाला आणि त्याच्या भावाला काही जणांनी दगड आणि काठीने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ११ मे) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सुजलॉन कंपनी समोर, महाळुंगे येथे घडली.
याबाबत हर्षल उल्हास शेप (वय ३६, सध्या रा. मोशी; मूळ रा. शेपवाडी, जि. बीड) यांनी सोमवारी (दि. ११ मे) रोजी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमीत गुंजाळ आणि त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षल यांनी अपघातात जखमी झालेल्या मंदाकिनी गुंजाळ (वय ४२, रा. शिरूर) यांना आरोपी सुमीतच्या मदतीने रुग्णालयात नेले होते. त्यानंतर पुन्हा घटनास्थळी आल्यावर आरोपीने विनाकारण शिवीगाळ सुरू केली. फिर्यादी जीव वाचवण्यासाठी सुजलॉन कंपनीत पळाले असता, आरोपींनी तिथे जाऊन त्यांना ओढत बाहेर काढले. आरोपी सुमीतने दगडाने फिर्यादीच्या डोळ्याखाली मारले, तर त्याच्या एका साथीदाराने लाकडी काठीने पायावर मारून जखमी केले. महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
अपघातातील जखमीला मदत करण्यास गेलेल्या तरुणाला मारहाण
