पुण्याच्या सुमित काटे यांचे डिझाइन अव्वल; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान
मुंबई :
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता अधिकृतरीत्या सुरू झाली आहे. या महाकुंभाच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘बोधचिन्हा’चे (लोगो) अनावरण मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
देशभरातून ३ हजार प्रवेशिका; तरुणाईचा मोठा सहभाग
कुंभमेळा प्राधिकरणाने ‘मायगव्ह’ प्लॅटफॉर्मवर देशव्यापी स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. विशेष म्हणजे, यामध्ये १८ ते २४ वयोगटातील तरुणांनी सर्वाधिक रस दाखवला. महाराष्ट्राने सहभागाच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावले.
विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने निवडलेल्या उत्कृष्ट तीन स्पर्धकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला:
प्रथम क्रमांक: सुमित काटे (पुणे) – ३ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह.
द्वितीय क्रमांक: मयांक नायक (नोएडा) – २ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह.
तृतीय क्रमांक: पीयुष पिंपळनेरकर (पंढरपूर) – १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह.
बोधचिन्हाचा अर्थ: अध्यात्म आणि वारशाचा संगम
हे बोधचिन्ह केवळ एक चित्र नसून नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या पवित्र परंपरेचा आरसा आहे:
त्रिशूळ: भगवान शंकराच्या आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक.
मंदिर प्रतिकृती: त्र्यंबकेश्वर आणि काळाराम मंदिराच्या कमानीद्वारे प्रादेशिक वारसा अधोरेखित केला आहे.
गोदावरी आणि शिवलिंग: गोदावरी नदीला ‘शिवलिंगा’च्या रूपात दर्शवण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील शाही स्नानाचे महत्त्व पटवून देते.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादाजी भुसे, उदय सामंत, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांसह विविध आखाड्यांचे साधू-संत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी आयोजनाची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित साधू-संतांचे स्वागत करून कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
