पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – जुन्या सांगवी येथील एका ब्युटी पार्लरमध्ये महिला ग्राहकाला आणि तिच्या जातीला उद्देशून अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरत जाहीर अपमान केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १२ मे) रोजी सायंकाळी घडली.
या प्रकरणी एका महिलेने बुधवारी (दि. १३ मे) रोजी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एका महिला आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पार्लरचे काम संपवून पैसे देण्यासाठी काउंटरपाशी बसली असताना, पार्लरच्या मालक प्रज्ञा सोनार यांच्याशी तिचे सामान्य विषयावर बोलणे सुरू होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आरोपी महिलेने चर्चेत सहभाग घेतला. नसरापूर येथे घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देत आरोपी महिलेने फिर्यादीच्या जातीबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि हीन भावना व्यक्त केली. ‘तुम्ही आरक्षणाचे खाता, भिकाऱ्यासारखे आरक्षण घेता’ अशा शब्दांत इतर ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसमोर अपमान केला. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
ब्युटी पार्लरमध्ये जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याप्रकरणी महिला अटकेत
