पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पवना नदीलगतच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अडड्यावर छापा टाकून १ लाख रुपयांचे कच्चे रसायन जप्त केले. ही कारवाई बुधवारी (दि. १३ मे) रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
या प्रकरणी महिला पोलीस हवालदार निलम बुचडे यांनी बुधवारी (दि. १३ मे) रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिला आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगावच्या हद्दीत पवना नदीकाठच्या मोकळ्या जागेत महिला आरोपी ही हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित कच्चे रसायन भिजत घालत असताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख रुपये किमतीचे हे कच्चे रसायन नष्ट केले. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पवना नदीकाठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा
