पिंपरी, दि. १५ (pimpri chinchwad) – घरात स्कुटीची चावी सापडत नसल्यासारख्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून पतीने आपल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत पत्नीच्या पाठीच्या मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. ही घटना १० मे रोजी थेरगाव येथे घडली.
बालाजी सुखानंद खटके (वय ३३, रा. अशोका सोसायटीजवळ, संभाजीनगर, प्रकाश कॉलनी, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या २७ वर्षीय पीडित पत्नीने गुरुवारी (दि. १४ मे) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, १० मे रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला सकाळी घरातील नेहमीची कामे करत होती. दरम्यान, आरोपी पती बालाजी याला त्याची स्कुटीची चावी सापडत नव्हती. चावी न मिळाल्याचा राग अनावर झाल्याने त्याने घरात काम करत असलेल्या पत्नीला थेट शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. राग एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपीने पत्नीचे केस ओढून “तू अशीच वागते, तुला काहीच जमत नाही,” असे म्हणत त्याने पत्नीची मान खाली दाबून तिच्या पाठीवर आणि बरगड्यांवर हाताने अत्यंत जोरदार बुक्के मारले. यामुळे पीडित महिलेच्या पाठीच्या मणक्याचे हाड फॅक्चर झाले.
पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.
