पुणे : मुंढवा परिसरातील झेड कॉर्नर भागात शनिवारी सकाळी एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. गेल्या पंधरा दिवसांतील हा तिसरा खून असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, झेड कॉर्नर परिसरात एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनास्थळी पोलिसांना मोबाइल संच सापडला असून, मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंढवा परिसरात गेल्या काही दिवसांत खुनांच्या घटना वाढल्या आहेत. अनैतिक संबंधातून एका ब्युटीपार्लर चालक तरुणीचा खून, तसेच दारूच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
