पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार झाडावर आदळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुणे-नाशिक हायवेवर भोसरी पोलीस ठाण्याजवळ गुरुवारी (दि. १४ मे रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली आहे.
आयुष विजय बनकर (वय २२, रा. बनकरवस्ती, मोशी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कार चालकाचे नाव असून पोलिसांच्या त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या अपघातात आशिष बाळासाहेब मुळीक (वय २२ रा. बनकरवस्ती, मोशी) हा गंभीर जखमी झाला आहे. अभिषेक बाळासाहेब मुळीक (वय २५, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी शनिवारी (दि. १६ मे) रोजी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास आयुष बनकर हा आपली स्विफ्ट डिझायर कार वेगाने चालवत होता. भोसरी पोलीस ठाण्याजवळ कारसमोर कुत्रा आल्याने त्यास वाचविण्याच्या नादात कार पलटी होऊन झाडावर आदळली. या अपघातात फिर्यादीचा धाकटा भाऊ आशिष मुळीक हा गंभीर जखमी झाला, तर चालक आयुष बनकर याचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कार झाडावर आदळून चालकाचा मृत्यू
