पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – एका खाजगी गाडीतून कत्तलीसाठी जनावरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी (दि. १७ मे) रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास देहूरोड येथील शितळा देवी मंदिराजवळ करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस हवालदार संपत सिरसाट यांनी रविवारी (दि. १७ मे) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश धनराज द्रविड (वय ३६, रा. देहूरोड), स्वरूप बरनाबोस मुनगंडा (वय २६, रा. देहूरोड) आणि सुर्याबा झेडे (वय २८, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका चारचाकी गाडीतून चार जर्सी गोवंश दोरीने निर्दयीपणे बांधून कत्तलीसाठी घेऊन जात होते. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही सोय नसताना अत्यंत कमी जागेत त्यांना कोंडण्यात आले होते. याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेत जनावरांची सुटका केली आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; तिघांना अटक
