चिंचवड:
कधी कधी नियती अशी काही परीक्षा घेते की माणसाचे अवसान गळून पडते. पण जर पाठीशी खाकी वर्दीतील कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील मन असेल, तर अशक्य गोष्टीही कशा शक्य होतात, याचा प्रत्यय चिंचवड पोलिसांच्या एका कामगिरीमुळे आला आहे. कोणताही सुगावा नसताना, केवळ सीसीटीव्ही फुटेज आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर चिंचवड पोलिसांनी मुंबईसारख्या अथांग महानगरीतून एका ३ वर्षांच्या चिमुरडीला आणि अवघ्या दीड महिन्याच्या नवजात बाळाला शोधून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या ‘ह्यूमन टच’ कामगिरीमुळे एका कुटुंबाचे उजळलेले संसार पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.
काय घडली होती घटना?
खेड तालुक्यातील पाईट गावचे रहिवासी महेंद्र रौंदळ यांची ३१ वर्षीय पत्नी दिपाली या मतिमंद आणि आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. त्या आपल्या ३ वर्षांच्या तनिष्का या मुलीला घेऊन चिंचवड येथील वाल्हेकरवाडीत माहेरी आल्या होत्या. मात्र, २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दिपाली या कोणालाही काही न सांगता मुलीला सोबत घेऊन घरातून निघून गेल्या. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, पण त्या सापडल्या नाहीत. अखेर हताश झालेल्या पतीने चिंचवड पोलीस ठाण्यात पत्नी व मुलगी बेपत्ता (मिसिंग क्र. ४५/२०२६) असल्याची तक्रार नोंदवली.
आई सापडली, पण मुलं गायब!
तपास सुरू असताना १४ एप्रिल रोजी दिपाली या डोंबिवलीत राहणाऱ्या त्यांच्या मामीच्या घरी सापडल्या. मात्र, त्यांना पाहताच पोलिसांच्या आणि कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला; कारण त्यांच्यासोबत ३ वर्षांची तनिष्का नव्हती आणि त्यांचे पोटही रिकामे होते (त्यांची डिलिव्हरी झाली होती). दिपाली या मतिमंद असल्याने त्यांना मुलांबाबत काहीच सांगता येत नव्हते. पोटची दोन लहान मुले कुठे आहेत? ती जिवंत तरी आहेत का? या विचाराने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
पोलिसांची शोधमोहीम: सीसीटीव्हीचा चक्रव्यूह आणि घाटकोपरचे धागेदोरे
चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार काझी आणि पोलीस शिपाई जगताप यांनी या आव्हानात्मक केसचा ताबा घेतला. सुरुवातीला त्यांनी डोंबिवलीतील बस डेपो, रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही तपासले, शासकीय रुग्णालये, अनाथ आश्रमात शोध घेतला, पण काहीच हाती लागले नाही.
तपासाची चक्रे फिरवत असताना दिपाली यांचे दुसरे मामा घाटकोपर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलीस तिथे पोहोचले, पण तिथेही दिपाली आल्या नव्हत्या. मात्र, हार न मानता काझी आणि जगताप यांनी स्थानिक हॉटेल, दुकानदार आणि नागरिकांकडे चौकशी केली. तेव्हा दीड महिन्यांपूर्वी एक गरोदर महिला लहान मुलीसह या परिसरात फिरत असल्याची पुसटशी माहिती मिळाली.
पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने घाटकोपर येथील गणेश नगर, साईनाथ नगर रोडवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. अखेर एका फुटेजमध्ये २ एप्रिलच्या रात्री ११:०५ वाजता दिपाली मुलीसह हनुमान मंदिराबाहेर बसलेल्या दिसल्या.
सायन हॉस्पिटलमधून पळालेली आई आणि ‘वात्सल्य’चा आसरा
मंदिराच्या परिसरात अधिक चौकशी केली असता, एका नागरिकाने सांगितले की, “त्या रात्री येथील चिराग नगर पोलिसांनी त्या महिला आणि मुलीला ताब्यात घेतले होते.” काझी आणि जगताप यांनी तात्काळ चिराग नगर पोलीस ठाणे गाठले. तिथे समजले की, पोलिसांनी त्या दोघींना चेंबूरच्या *’वात्सल्य फाउंडेशन’*मध्ये जमा केले होते.
दिपाली या गरोदर असल्याने फाउंडेशनने त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे ७ एप्रिल रोजी त्यांनी एका सुंदर बाळाला जन्म दिला. मात्र, मानसिक आजारामुळे डिलिव्हरीनंतर ३-४ दिवसांतच दिपाली कोणालाही न सांगता नवजात बाळाला रुग्णालयात सोडून पळून गेल्या होत्या. याप्रकरणी सायन पोलिसांतही दिपाली यांच्या बेपत्ता असण्याची तक्रार नोंदवली गेली होती.
सुखरूप गळाभेट; पोलिसांच्या डोळ्यात आनंदाश्रू
हवालदार काझी आणि शिपाई जगताप यांनी तात्काळ ‘वात्सल्य ट्रस्ट’ गाठले. तिथे ३ वर्षांची तनिष्का आणि ते दीड महिन्याचे नवजात बाळ सुखरूप असल्याचे पाहून पोलिसांच्या जीवात जीव आला.
”जेव्हा आम्ही त्या दोन निष्पाप जीवांना सुखरूप पाहिले, तेव्हा आमच्या पाठीवर खाकी वर्दी असल्याचा सार्थ अभिमान वाटला. एका आई-वडिलांना त्यांची मुलं परत मिळवून देण्यासारखा दुसरा कोणताही आनंद नाही.”
— पोलीस हवालदार काझी
दुसऱ्या दिवशी मुलांचे वडील महेंद्र रौंदळ यांना मुंबईत बोलावण्यात आले. मानखुर्द येथील बाल कल्याण समितीच्या (CWC) अधिकाऱ्यांसमोर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, दोन्ही चिमुरड्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. आज चिंचवड पोलिसांनी या दोन्ही मुलांना चिंचवड येथे आणून त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे.
कोणताही धागादोरा नसताना, मुंबईच्या अथांग गर्दीतून केवळ कौशल्याच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर या दोन मुलांचा शोध घेणाऱ्या पो. हवा. काझी आणि पो. शि. जगताप यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, खाकी वर्दीतील या ‘माणुसकी’ला सलाम केला जात आहे.
खाकीतील ‘देवदूत’! चिंचवड पोलिसांची कमाल; मुंबईच्या गर्दीतून शोधल्या २ चिमुरड्या, आई-वडिलांची झाली गळाभेट
