पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – संत तुकारामनगर मेट्रो रेल्वे स्टेशनखाली रस्ता दुभाजकातील झाडांना पाणी घालत असलेल्या पाण्याच्या टँकरला एका भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टँकरसोबत काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २१ मे) रोजी सकाळी ७:१० वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे.
शामसुंदर शेषराम गौतम (वय २२, रा. आबा काटे चाळ, स्मशानभूमी जवळ, दापोडी. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. नरेशकुमार सुरेंद्र दास (वय २४, रा. मु. पेदरगाव, महाराष्ट्र मेडिकलजवळ, पनवेल, जि. रायगड. मूळ गाव- मधुबनी, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी टक्र चालकाचे नाव आहे. याबाबत टँकर चालक गणेश शंकर जाधव (वय ३६, रा. आबा काटे चाळ, बौद्धविहार जवळ, दापोडी) यांनी गुरुवारी (दि. २१ मे) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश जाधव हे संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन येथील पिलरखाली रस्ता दुभाजकामध्ये असलेल्या झाडांना टँकरने पाणी टाकत होते. याच वेळी आरोपी नरेशकुमार दास याने आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. MH 43 BG 3020) हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवून टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत टँकरचे मोठे नुकसान झाले, तसेच टँकरसोबत काम करणारा मजूर हा गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार करीत आहेत.
टँकरला ट्रकची धडक; मजूर ठार, चालक अटकेत
