​आषाढी वारी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड मनपा सज्ज

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून पालखी मार्ग आणि विसावा ठिकाणांची पाहणी

​पिंपरी-चिंचवड :
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे येत्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर, वारकऱ्यांना दर्जेदार सेवा-सुविधा पुरवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण पालखी मार्ग, स्वागत कक्ष, मुक्काम आणि विसावा ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व विभागांनी आपापसात उत्तम समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

​आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी निगडी येथील भक्ती-शक्ती चौक, आकुर्डी येथील खंडोबा माळ व मौलाना आझाद विद्यालय, खराळवाडी, दापोडी तसेच मोशी येथील मॅगझिन चौक आणि वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणांना भेटी देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. या दौऱ्यात मनपाचे अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​सुरक्षा आणि सुविधांबाबत आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश:

​वैद्यकीय व जलसुविधा: वारकऱ्यांसाठी २४ तास मोफत वैद्यकीय सेवा, फिरते दवाखाने, रुग्णवाहिका आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करणे.

​पायाभूत सुविधा: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवणे, नालेसफाई करणे आणि पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे.
​स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापन: मुक्काम व विसावा ठिकाणी फिरती शौचालये, नियमित जंतुनाशक फवारणी, २४ तास कार्यरत कंट्रोल रूम आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवणे.

​सुरक्षा यंत्रणा: धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करणे, अग्निशमन दल सज्ज ठेवणे आणि संपूर्ण मार्गावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुस्थितीत ठेवणे.
​”वारकऱ्यांच्या सुरक्षेशी आणि सुविधांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने पोलीस यंत्रणेशी समन्वय ठेवून हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा,” असा विश्वास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *