चिंचवडला झोडपले! अवघ्या अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने चिंचवडमध्ये सर्वाधिक ६० मिमी नोंदीची ‘बॅटिंग’

​पुणे जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; डुडूळगाव आणि हडपसरमध्येही जोरदार सरी,
पहा कुठे किती पाऊस झाला?
​पिंपरी-चिंचवड:
पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्‍या पावसाने संपूर्ण शहराला अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासाच्या या वादळी पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले. हवामान विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड भागात झाली आहे. चिंचवडमध्ये तब्बल ६०.० मिमी इतका मुसळधार पाऊस पडला. गर्मीमुळे हैराण झालेल्‍या पिंपरी चिंचवडकरांना काहीसा दिलासा मिळाला.

चिंचवड अव्वल, दुडूळगावातही जोरदार हजेरी
​शहरात दुपारी अचानक काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवडमधील दुडूळगाव परिसरातही ३८.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने सखल भागांत पाण्याचे साचले होते, ज्यामुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता.

नागरिकांची उडाली तारांबळ!
​हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याने हवेतील उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी ऐन कामावरून घरी परतण्याच्या वेळी आलेल्या या पावसामुळे चाकरमाने, व्यावसायिक आणि वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. जिल्ह्यातील शिरूर, हडपसर आणि आंबेगाव भागातही पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

पुणे जिल्हा आणि परिसरातील पाऊस (मिमी मध्ये):
​हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध केंद्रांवर खालीलप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे:
अनुक्रमांक परिसर / ठिकाण पाऊस (मिलीमीटरमध्ये)
१ चिंचवड (PCMC) ६०.०
२ दुडूळगाव ३८.०
३ हडपसर ३७.५
४ शिरूर ३५.५
५ एनडीए (NDA) २९.५
६ आंबेगाव २८.०
७ राजगुरुनगर २७.०
८ भुगाव २१.०
९ कुरवंडे १७.०
१० शिवाजीनगर १३.१
११ पाषाण १३.०
१२ कोरेगाव पार्क ९.५
१३ नारायणगाव ६.५
१४ लवळे ४.५
१५ तळेगाव ०.७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *