pimpri chinchwad-कॅब चालकांसाठी महत्त्वाची बातमी! एलएमव्ही-टीआर बॅजची कामे आता कासारवाडीत होणार
कॅब चालकांसाठी महत्त्वाची बातमी! एलएमव्ही-टीआर बॅजची कामे आता कासारवाडीत होणार
२५ मेपासून आयडीटीआर केंद्रात सुरू होणार सुविधा; आरटीओचे चालकांना आवाहन
पुणे :
कॅब आणि लोकसेवा वाहन चालकांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध होणार आहे. एलएमव्ही-टीआर (कॅब) वाहन संवर्गातील बॅजसंदर्भातील सर्व कामकाज आता कासारवाडी येथील वाहन चालन प्रशिक्षण संस्था (आयडीटीआर) केंद्रातून करण्यात येणार आहे. येत्या सोमवार, २५ मे २०२६ पासून ही सुविधा प्रत्यक्ष सुरू होणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.
मोटार वाहन कायदा आणि संबंधित नियमांनुसार लोकसेवा वाहन चालविणाऱ्या चालकाकडे वैध वाहन परवाना तसेच लोकसेवा वाहन चालविण्याचे अधिकृत प्राधिकारपत्र अर्थात बॅज असणे बंधनकारक आहे. विशेषतः कॅब, टॅक्सी आणि व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी हा बॅज अत्यावश्यक मानला जातो.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि बॅजसंदर्भातील प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आरटीओ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे चालकांना आता बॅजसंबंधीची कामे एकाच ठिकाणी अधिक वेगाने पूर्ण करता येणार आहेत.
आरटीओ प्रशासनाने चालकांना वेळेत बॅजसंदर्भातील कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक कागदपत्रांसह चालकांनी कासारवाडी येथील आयडीटीआर केंद्रात संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.