वासुली फाटा येथे भाजी खरेदी करण्यासाठी थांबलेल्या एका तरुणाने आपल्या अंगावर गाडी घातली असा गैरसमज करून घेत एका टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून बरगडी फॅक्चर केली. ही घटना गुरुवारी (२१ मे) रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास वासुलीकडून भांबोली गावाकडे जाणाऱ्या रोडवर घडली.
पंकज विजय कुमार (३४, महाळुंगे, खेड, पुणे; मूळ गाव- दिल्ली) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल एकनाथ राऊत (३०), त्याचा भाऊ योगेश एकनाथ राऊत (३५) आणि त्याचे वडील एकनाथ राऊत (५०, भांबोली, खेड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज हे त्याचा मित्र ओम महाडीक याच्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलवरून (एमएच14/जीएन5367) वासुली फाटा येथे भाजी खरेदी करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अमोल याला पंकज यांनी त्याच्या अंगावर गाडी घातली असे वाटल्याने त्याने त्याचे वडील व भावाला बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पंकज यांच्या उजव्या बाजूच्या बरगडीवर मार लागल्याने त्यांची बरगडी फॅक्चर झाली. त्यानंतर आरोपींनी पंकज यांना जीवे मारण्याची धमकी दिली. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
