पावसाळ्यापूर्वी मनपा अलर्ट मोडवर; पिंपरी-चिंचवडमध्ये २४ तास पूर नियंत्रण कक्ष सज्ज

​पूरस्थितीला तोंड देण्यासाठी ‘मान्सून कृती आराखडा २०२६’ लागू; अग्निशमन, आरोग्य आणि QRT पथके तैनात

पिंपरी-चिंचवड ः
आगामी पावसाळ्यात शहरात पूरस्थिती, पाणी साचणे आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने व्यापक तयारी सुरू केली आहे. महापालिकेने ‘मान्सून कृती आराखडा २०२६’ तयार केला असून, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात २४ तास कार्यरत राहणारे पूर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

पावसाळ्यात सखल भागांमध्ये निर्माण होणाऱ्या धोक्याचा विचार करून महापालिकेने संभाव्य पूरस्थितीचे वर्गीकरण केले आहे. पवना आणि मुळशी धरणातील विसर्गावर सतत लक्ष ठेवले जाणार आहे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांना मेगाफोनद्वारे सतर्क केले जाणार असून, आवश्यकतेनुसार स्थलांतराची तयारीही करण्यात आली आहे.

​पूरग्रस्तांसाठी शाळा आणि सार्वजनिक इमारतींमध्ये निवारा केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अग्निशमन दलाची रबर बोटी, लाईफ जॅकेट आणि प्रशिक्षित जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक विभागात जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत.

​शहरातील नालेसफाई, झाडांची छाटणी, रस्त्यांची दुरुस्ती आणि धोकादायक होर्डिंग्ज हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने औषधसाठा आणि फवारणी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

​महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. तर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *