१०४ टँकरची धावपळ; पुणे जिल्ह्यातील १११ गावे, ४२६ वाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेची मोठी मोहीम
दुरुस्ती, बोअरवेल आणि योजनांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर

​पुणे ः
पुणे जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने मोठी उपाययोजना सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील तब्बल १११ गावे आणि ४२६ वाड्यांना १०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सुमारे १ लाख ७३ हजार ५९१ नागरिकांना दिलासा मिळत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाईग्रस्त भागात युद्धपातळीवर काम सुरू केले असून, विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

​जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर आणि पुरंदर तालुक्यांमध्ये टंचाईची तीव्रता अधिक आहे. या भागांत टँकरच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक २५ टँकर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

​ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४३ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी शासनाने ५ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामांमुळे अनेक गावांमधील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार आहे.

​याशिवाय, जिल्ह्यातील ६११ बंद बोअरवेल्स दुरुस्त करण्यासाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच ३१ नवीन बोअरवेल योजनांनाही मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी २६ लाख ३५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

​प्रशासनाच्या मते, टँकरच्या फेऱ्या नियमित सुरू असून नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यावर भर दिला जात आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन सतत आढावा घेत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *