टेबल आणि खुर्ची साईडला घेण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात काही तरुणांनी एका मजुराला काचेच्या बाटल्या फेकून मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर आणि दुकानांवर बाटल्या फेकून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (२८ मे) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथील वाईन किंग दुकानाच्या बाहेर घडली.
या प्रकरणात रिपन निरन बरमन (२२, खराबवाडी, खेड, पुणे) यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल अरविंद गावडे (२४, खराबवाडी, खेड, पुणे; मूळ- बिदर, कर्नाटक), सलमान रहिम नदाफ (२४, खराबवाडी, खेड, पुणे; मूळ- बिदर, कर्नाटक) आणि गुफरान कलीम अहमद (२५, मेदनकरवाडी, खेड, पुणे; मूळ- ग्राम बिसवा, सितापुर, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दारू पीत असताना टेबल व खुर्ची बाजूला घेण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी “मी राहुल भाई असून तुम्ही बाहेर चला तुम्हाला दाखवतो” अशी धमकी दिली. त्यानंतर वाईन शॉपबाहेर पडलेल्या काचेच्या बाटल्या फिर्यादीच्या दिशेने फेकल्या, ज्यातील एक बाटली डोक्यात लागल्याने फिर्यादी जखमी झाले. आरोपींनी तळेगाव-चाकण रोडवरील लोकांवरही बाटल्या फेकल्याने नागरिक घाबरून पळाले व दुकानदारांनी भीतीपोटी दुकाने बंद केली. आरोपी आरडाओरडा व शिवीगाळ करत पळून गेले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
