पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका दिवसात उध्वस्त केले दारू बनविण्याचे सव्वा नऊ लाखांचे रसायन

पिंपरी चिंचवड पोलिसांनी चाकण, महाळुंगे आणि शिरगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्यांवर शुक्रवारी (29 मे) पाच कारवाया केल्या. एका दिवसात केलेल्या कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल नऊ लाख 25 हजार रुपये किमतीचे दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले.

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे लगत दारूभट्टी, पोलिसांची कारवाई

एका महिलेने पुणे-मुंबई एक्सप्रेस वे लगत एका खड्ड्यात बेकायदेशीर हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी १ लाख ४० हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन भिजत घातले होते. पोलीस पथक शुक्रवारी (२९ मे) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचल्याची चाहुल लागताच महिला आरोपी रसायन सोडून तेथून पळून गेली. याबाबत शिरगाव येथील एका महिलेच्या विरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निघोजे येथे बेकायदेशीर दारू जप्त

निघोजे येथील येथील डोंगराळ भागात एका पत्र्याच्या शेडजवळ नितीन धोंडीबा गायकवाड(५३, निघोजे, खेड) या व्यक्तीने विनापरवाना व बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर शुक्रवारी (२९ मे) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. नितीन गायकवाड विरोधात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

शिरगाव येथे दारूभट्टीवर छापा

एका महिलेने शिरगाव गावच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला जमिनीत एक खड्डा खोदून त्यात ताडपत्री टाकून त्यावर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित कच्चे रसायन भिजत घातले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १० हजार लिटर रसायन जप्त केले असून त्याची किंमत ३ लाख ५० हजार रुपये आहे. पोलीस आल्याचे समजताच महिला आरोपी पळून गेली. महिलेच्या विरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहुळ गावात गुन्हे शाखेची कारवाई

खेड तालुक्यातील बहुळ गावच्या हद्दीत एका ठिकाणी एका महिलेने तीन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये एकूण ८०० लिटर उग्र वासाचे गावठी दारू तयार करण्याचे रसायन भिजत घातले होते, ज्याची किंमत ४० हजार रुपये होती. गुन्हे शाखेच्या युनिट तीन या पथकाने शुक्रवारी (२९ मे) सायंकाळी पंचांसमक्ष ते रसायन आणि प्लास्टिक ड्रम जागीच नष्ट केले असून आजूबाजूला चौकशी केली असता ते ड्रम संबंधित महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले. महिलेच्या विरोधात चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओझर्डे येथे पावणेचार लाखांचे कच्चे रसायन नष्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओझर्डे गावातील पवना नदीकाठी एक महिला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी गुळमिश्रित कच्चे रसायन भिजत घालत होती. पोलिसांनी धाड टाकून ३५ रुपये प्रति लिटर दराचे एकूण ११ हजार लिटर कच्चे रसायन जप्त केले, ज्याची एकूण किंमत ३ लाख ८५ हजार रुपये आहे. पोलिसांची चाहुल लागताच आरोपी महिला तेथून पसार झाली. ही कारवाई शुक्रवारी (२९ मे) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी हे रसायन नष्ट केले आहे. याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *