पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक केले. ट्रक पुढे जाऊन अचानक वळाला. या ट्रकला धडकल्याने दुचाकी वरील एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ३१ मे) रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास गायकवाड नगर पुनावळे येथे घडली.
ओमकार शिखरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा घनश्याम शर्मा (वय १८, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ३१ मे) रोजी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (डीएल १/एलएएन ६३२२) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा आणि त्यांचा मित्र ओमकार हे दोघे जेएसपीएम कॉलेज येथून हिंजवडीकडे दुचाकीवरून जात होते. गायकवाडनगर, पुनावळे येथे आल्यानंतर ट्रकने ओव्हरटेक केले. त्यानंतर ट्रक अचानक वळला. या ट्रकला दुचाकीची धडक बसली. यामध्ये दुचाकी वरील दोघेही खाली पडले. गंभीर जखमी झाल्याने ओमकार याचा मृत्यू झाला. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
ओव्हरटेक केलेल्या ट्रकला धडकून तरुणाचा मृत्यू
