पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – चिंचवड मधील रामनगर येथे जावयाच्या घरासमोर भांडण करणाऱ्या सासूला जावयाने घरी जाऊन भांडण करण्याचा सल्ला दिला. त्या कारणावरून पत्नी, सासू आणि मेहुण्याने जावयाला बेदम मारहाण करत जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. ३० मे) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
सचिन अरुण देवकाते (वय ३८, रा. रामनगर, चिंचवड) असे मारहाण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ३१ मे) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेहुणा संदीप महानवर (वय २२), सासू (वय ४५) आणि पत्नी (वय ३०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांची सासू फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन एका महिलेसोबत भांडण करत होती. त्यामुळे सचिन यांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊन भांडण करण्यास सांगितले. त्या कारणावरून सचिन यांची सासू, पत्नी आणि मेहुण्याने मिळून त्यांना बेदम मारहाण करून जखमी केले. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
चिंचवडमध्ये जावयाला बेदम मारहाण; पत्नीसह सासू, मेहुण्यावर गुन्हा दाखल
