पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मे महिन्यात अभूतपूर्व मोहीम राबवली. अवघ्या एका महिन्यात ६२ हजार ७२७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून तब्बल ६ कोटी ७६ लाख ३० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. औद्योगिक व आयटी क्षेत्राचा विस्तार होत आहे. शहरातून राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जातात. त्यामुळे वाहतुकीवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेतली.
१ ते ३१ मे या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने, नो पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने आणि नियमभंग करणाऱ्या चालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
या मोहिमेत सर्वाधिक १९ हजार ३४० कारवाया नो पार्किंग आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर करण्यात आल्या. तर ११ हजार ५८० वाहने टोईंग करण्यात आली. सिग्नल तोडणाऱ्या ८ हजार ४८३ चालकांवर कारवाई झाली. जड वाहनांवरील ८ हजार १४२, ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ६ हजार ५३९ आणि नंबर प्लेट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ हजार ४७५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
याशिवाय मोबाइलवर बोलत वाहन चालविणारे, मद्यप्राशन करून वाहन चालविणारे, कर्कश आवाजाचे मॉडिफाईड सायलेंसर वापरणारे तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गंभीर नियमभंग करणाऱ्या १६६ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले.
वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि अपघातांना आळा घालणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी.
– विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग)
