मानव तस्करी विरोधी कक्षाची धडक कारवाई; स्पा चालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा, शहरभर सुरू कडक मोहीम
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. वाकड परिसरातील एका स्पा सेंटरवर टाकलेल्या छाप्यात अनैतिक व्यवसायाचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा चालक आणि महिला व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी कक्षाला वाकडमधील भुजबळ वस्ती परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गोपनीय पडताळणी केली. प्राथमिक खात्री झाल्यानंतर ५ जून रोजी सायंकाळी स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला.
तपासादरम्यान स्पाच्या आडून महिलांना पैशांचे आमिष दाखवून अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीसांनी तात्काळ कारवाई करत दोन महिलांची सुटका केली. संबंधित स्पा चालक आणि महिला व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शहरातील अनैतिक व्यवसायांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत १६ ठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले आहे. त्यामध्ये ११ स्पा सेंटर, ४ हॉटेल्स आणि एका ऑनलाइन नेटवर्कवर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवायांमध्ये ३८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ३७ महिलांची सुटका करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन स्पा सेंटर आणि एका हॉटेलवर वर्षभरासाठी बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील अनैतिक व्यवसाय, मानव तस्करी आणि बेकायदेशीर कृत्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या गैरकृत्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
