फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने १६ लाख ७६ हजारांचा गंडा

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर फ्लॅट विक्रीची जाहिरात पाहून फ्लॅटचा व्यवहार करून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची १६ लाख ७६ हजार ७६० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २२ मार्च ते ५ जून या कालावधीत औरम वाटीका सोसायटी, दिघी येथे ऑनलाईन स्वरूपात घडली.

या प्रकरणात एका ४२ वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेम शुक्ला, शिवशंकर श्रीधर कुलकर्णी, विरु सिंघ आणि इतर ५ विविध बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मोशी येथील आपला फ्लॅट विकण्यासाठी ऑनलाईन जाहिरात दिली होती. आरोपींनी फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधून फ्लॅट विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर फ्लॅटचा व्यवहार आणि एम.ओ.यु. करून देण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी फिर्यादीकडून एकूण १६ लाख ७६ हजार ७६० रुपये विविध बँक खात्यांवर भरण्यास प्रवृत्त केले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे फोन उचलणे बंद करून त्यांची आर्थिक फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *