(pimpri chinchwad)-पहिल्या पाच महिन्यांतच दंडाचा दणका; नियम मोडल्यास दुसऱ्यांदा थेट १५०० रुपये फटका; अपघातांना आळा घालण्यासाठी मोहीम तीव्र
बीआरटी (BRT) मार्ग हा केवळ सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव असतानाही, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना सांगवी पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. सांगवी वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने बीआरटी लेनमधून बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई सुरू आहे. चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच तब्बल ४ हजार बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या वर्षीचा आकडा पार होणार?
सांगवी, पिंपळे सौदागर आणि परिसरातील बीआरटी मार्गावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. गेल्या संपूर्ण वर्षात या परिसरात सुमारे ६ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, यंदा अवघ्या पाच महिन्यांतच हा आकडा ४ हजारांवर पोहोचला आहे. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
दुसऱ्यांदा चूक केल्यास ‘दीड हजार’ दंड!
वाहनचालकांनी बीआरटी लेनमध्ये प्रवेश करू नये, यासाठी दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार:
पहिल्यांदा नियम मोडल्यास: संबंधित वाहनचालकावर ५०० रुपये दंड आकारण्यात येतो.
दुसऱ्यांदा तीच चूक केल्यास: दंडात तिप्पट वाढ करून थेट १,५०० रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे.
शॉर्टकट ठरतोय जीवघेणा!
बीआरटी मार्ग हा केवळ ‘पीएमपीएमएल’ (PMPML) च्या गतिमान बस सेवेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, अनेक वाहनचालक वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी किंवा शॉर्टकट मारण्यासाठी या राखीव मार्गात आपली वाहने घुसवतात. बऱ्याचदा समोरून येणाऱ्या बसचा अंदाज न आल्याने किंवा वेगावर नियंत्रण न राहिल्याने समोरासमोर भीषण अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. हे जीवघेणे अपघात रोखण्यासाठीच आता सांगवी पोलिसांनी कंबर कसली आहे.
प्रतिक्रिया
”बीआरटी मार्ग हा केवळ ‘पीएमपीएमएल’ बसेसच्या सुरक्षित प्रवासासाठी राखीव आहे. अन्य कोणत्याही वाहनचालकांनी या मार्गात प्रवेश करू नये. बीआरटीमध्ये घुसून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर यापुढील काळातही ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल.”
