व्हॉट्सॲपवरील एका संदेशाने वाहतूक समस्यांवर उपाय; पिंपरी-चिंचवडकरांचा वाढता विश्वास
पिंपरी-चिंचवड :
वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, सिग्नल बिघाड किंवा नियमभंग करणाऱ्या वाहनांची तक्रार करण्यासाठी आता नागरिकांना पोलीस ठाणे किंवा वाहतूक शाखेच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. मोबाईलवरील एका व्हॉट्सॲप संदेशाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविणारा ‘ट्रॅफिक बडी’ चॅटबॉट पिंपरी-चिंचवडकरांचा खरा वाहतूक मित्र ठरत असल्याचे समोर आले आहे. मे महिन्यात या माध्यमातून प्राप्त झालेल्या तब्बल एक हजार ३६५ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याने या उपक्रमाची प्रभावीता अधोरेखित झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाहनांचा वाढता ताण यामुळे वाहतूक व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सहभागातून वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ‘ट्रॅफिक बडी’ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्यात आला. पोलीस सह आयुक्त शशीकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कार्यरत आहे.
या चॅटबॉटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तक्रार नोंदविण्याची सुलभ प्रक्रिया आणि तातडीने होणारे निवारण. नागरिकांनी पाठविलेल्या तक्रारींवर २४ तासांच्या आत कारवाई केली जाते. कारवाईनंतर संबंधित तक्रारदाराला मोबाईलवर निवारणाचा अहवाल पाठविला जातो. त्यामुळे तक्रार प्रक्रियेत पारदर्शकता वाढली असून नागरिकांचा विश्वासही दृढ झाला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहतूक कोंडी, वाहतुकीतील अनियमितता, खराब रस्ते, बेकायदेशीर पार्किंग, ट्रॅफिक सिग्नलमधील बिघाड, वाहतूक सुधारणेबाबत सूचना तसेच अवजड वाहनांकडून होणारे नियमभंग अशा आठ विविध प्रकारच्या तक्रारी नागरिकांना फोटोसह थेट नोंदविता येतात. त्यामुळे घटनास्थळावरील वस्तुस्थिती प्रशासनापर्यंत त्वरित पोहोचत आहे.
विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ तक्रारींपुरता मर्यादित नाही. शहरातील नागरिकांना वाहतूक व्यवस्थापनात प्रत्यक्ष योगदान देता यावे यासाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे.
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक समस्या सोडविण्याचा हा अभिनव प्रयोग यशस्वी ठरत आहे. एका महिन्यात एक हजार ३६५ तक्रारींचा निपटारा झाल्याने ‘ट्रॅफिक बडी’ हा केवळ चॅटबॉट नसून वाहतूक व्यवस्थापनातील प्रभावी डिजिटल शस्त्र बनल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख यांनी नागरिकांना ८७८८६४९८८५ या ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सॲप क्रमांकाचा अधिकाधिक वापर करून वाहतूक व्यवस्थापनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
