पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील नेहरूनगर परिसरातील दोस्ती बेकरीच्या मागे वाल्मीकी चाळ येथे विनापरवाना एक बारा बोअर बंदूक व ५ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ११ जून) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अजयकुमार गोपाल सिंह (वय ३७ वर्षे, रा. वाल्मीकी चाळ, नेहरूनगर, पिंपरी, मूळ- बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार संतोष भानुदास राजपूत यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस सहआयुक्तांनी परिसरात घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू केला होता. या आदेशाचा भंग करून आरोपीने स्वतःच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीची १२ बोअर बंदूक व ५०० रुपयांची ५ जिवंत काडतुसे विनापरवाना बाळगली असताना तो रंगेहात सापडला. या प्रकरणाचा पुढील तपास संततुकारामनगर पोलीस करीत आहेत.
बंदूक व काडतुसांसह आरोपीला अटक
