पिंपरी-चिंचवड :
महानगरपालिकेचा कारभार आणि त्यांची उदासीनता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेचे हजारो कोटींचे बजेट असूनही, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृहात कलाकारांची जी कोंडी होत आहे, ती अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. ‘व्हीआयपी’ संस्कृती जपणाऱ्या महापालिकेला कलेची सेवा करणाऱ्या कलाकारांचा मात्र पूर्णपणे विसर पडल्याचे चित्र आहे.
’व्हीआयपी’ चकाचक, कलाकार मात्र घामाघूम!
नाट्यगृहात दोन व्हीआयपी (VIP) रूम्स आहेत, तिथे मात्र ३-४ उत्तम दर्जाचे एसी (AC) थाटामाटात लावण्यात आले आहेत. पण ज्या कलाकारांच्या दमावर हे नाट्यगृह चालते, प्रेक्षक गर्दी करतात, त्या कलाकारांच्या मुख्य मेकअप रूममध्ये मात्र एकही एसी नाही! उन्हाळ्याच्या दिवसांत या खोल्यांमध्ये साधी खेळती हवा देखील नाही. अशा अत्यंत कोंदट वातावरणात कलाकारांचा जीव नकोसा होत असून, त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
३-४ वर्षांपासून फक्त आश्वासनांची खैरात; प्रशासनाचे उत्तर ऐकून संताप अनावर!
गेल्या ३-४ वर्षांपासून “एसी लावू, काम होईल” असे सांगून केवळ वेळ मारून नेली जात आहे. अखेर सहनशीलतेचा अंत झालेल्या काही कलाकारांनी जेव्हा तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली की, “अजून मेकअप रूममध्ये एसी का लागले नाहीत?” तेव्हा कर्मचाऱ्यांनी दिलेले उत्तर थक्क करणारे होते. “अजून टेंडर पास झाले नाही, फक्त चर्चा सुरू आहे. टेंडर बनेल, मग काम होईल… याला अजून काही महिने लागतील!” असे बेजबाबदार उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.
”शेवटी आमच्या मर्यादा संपतात.. सुधारणा करा! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने याची तात्काळ दखल घ्यावी.”
— त्रस्त कलाकारांची सोशल मीडियावरील उद्विग्न हाक.
सोशल मीडियावर व्यथा मांडली, संपूर्ण राज्यात नाचक्की!
प्रशासनाच्या या ‘थंड’ कारभारामुळे त्रस्त झालेल्या कलाकारांनी आता थेट सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. एवढेच नव्हे तर थेट प्रेक्षकांसमोर जाऊन स्टेजवरून आपल्या मनातील तीव्र भावना आणि संताप व्यक्त केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या ढिसाळ आणि दुजाभावाच्या धोरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पालिकेची प्रचंड नाचक्की होत आहे.
आता तरी ‘कुंभकर्णी’ झोपेतून जागे होणार का?
कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला कलाकारांसाठी एक एसी टेंडर काढायला काय तीन वर्षे लागतात का? असा जळजळीत सवाल आता रंगभूमीवरून विचारला जात आहे. व्हीआयपी नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना एसी हवेत, मग कलाकारांना का नाही? कलाकारांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे महापालिकेने आता या गंभीर प्रकरणाची पिंपरी चिंचवड महापालिकेने तात्काळ दखल घेऊन, टेंडरच्या फाईली बाजूला सारून युद्धपातळीवर मेकअप रूममध्ये एसी बसवावेत, अन्यथा कलाकारांचा हा संताप महापालिकेला जड जाईल, यात शंका नाही!
