पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – भारतीय रेल्वे आणि वन विभागात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना बनावट जॉइनिंग लेटर देऊन तब्बल २१ लाख ८७ हजार ७३ रुपयांची फसवणूक केली. ही घटना काळेवाडी येथे ४ एप्रिल २०२३ रोजी घडली.
विक्रम पवार (रा. डांबरीतांडा, जि. जालना), निलेश वाकचौरे (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश सुरेश कुलकर्णी (वय ३५, रा. सुखवानी पॅनोरमा, सुसगाव, पुणे) यांनी मंगळवारी (दि. १६ जून) रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी हितेश कुलकर्णी, अंकुश किसन राठोड व प्रशांत विठ्ठलराव जाधव यांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवले. त्यासाठी कुलकर्णी यांच्याकडून सात लाख ८७ हजार रुपये, राठोड यांच्याकडून चार लाख ३० हजार रुपये आणि जाधव यांच्याकडून नऊ लाख ७० हजार ७३ रुपये असे एकूण २१ लाख ८७ हजार ७३ रुपये उकळले. त्यानंतर त्यांना बनावट जॉइनिंग लेटर व इतर बनावट कागदपत्रे देऊन त्यांची फसवणूक केली. पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक
