मुंबई(mumbai)-उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास उडाला असल्यानेच ते आज दिल्लीतील बैठकीला अनुपस्थित राहिले, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी केली. बाळासाहेब भवन येथे पत्रकारांशी खासदार देवरा यांनी संवाद साधला.
खासदार देवरा म्हणाले की, उबाठाकडून पक्षाध्येश जारी करुन देखील आज दिल्लीतील बैठकीला सहा खासदार अनुपस्थित राहिले, याचे कारण उद्धव ठाकरेच सांगू शकतात. पण खासदार उबाठा पक्षात नाराज आहेत आणि त्यांचा आता उद्धव ठाकरेंवर विश्वास राहिलेला नाही, असे खासदार देवरा म्हणाले. महाराष्ट्रातील जनता आणि लोकप्रतिनिधींचा एकनाथ शिंदेंवर विश्वास वाढत आहे. त्यामुळे राज्यभरातून विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ज्यांना शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहेत ते शिवसेनेचे हात मजबूत करत आहेत, असे खासदार म्हणाले. लोकांमधून निवडून आलेल्या खासदारांना मतदार संघात विकास कामे करायची आहेत. आम्ही कोणाला फोडत नसून जोडण्याचे काम करत आहोत, असे खासदार देवरा म्हणाले. शिवसेनेत येणाऱ्यांचे आम्ही स्वागतच करु, असे ते म्हणाले.
खासदार देवरा म्हणाले की पक्षाची बैठक आणि त्यासंबधी नियम काय, व्हीप केव्हा जारी केला जातो, याबाबत उबाठा खासदारांनी माहिती घ्यायला हवी. संसदेत होणाऱ्या मतदानापुरता व्हीप जारी केला जातो. पक्षाच्या कोणत्याही बैठकीसाठी व्हीप जारी केला जात नाही. उबाठाचे खासदार इतकी वर्ष संसदेत आहेत, मात्र त्यांना नियमावली माहिती नाही, याबाबत खासदार देवरा यांनी आश्चर्य व्यक्त केले.
संजय राऊत यांच्यावर संस्कार नसल्याने ते खासदारांना शिव्या देतात. राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. कधी राऊत दावा करतात की खासदार त्यांच्या सोबत आहेत तर कधी खासदारांवर पैसे घेतल्याचे आरोप करतात. राऊत यांच्या बोलण्यातला विरोधाभास म्हणजे त्यांचे संतुलन बिघडल्याचे दर्शवतो, अशी टीका खासदार देवरा यांनी केली. राऊतांकडून वारंवार होणाऱ्या अपमानामुळे त्यांच्या पक्षात कोणी थांबण्यास तयार नाही, असे देवरा म्हणाले. लोक पक्ष सोडून का जात आहेत, याबाबत उबाठाने आत्मपरिक्षण केले पाहिजे, असा सल्ला खासदार देवरा यांनी दिला.
