मुंबई(mumbai) : इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
इचलकरंजीच्या पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या विविध पर्यायांचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतर शासनाकडून अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल. शहराच्या वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना राबविण्यावर शासनाचा भर असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस धैर्यशील माने, राहुल आवाडे, इचलकरंजीचे महापौर व उपमहापौर, तसेच एकनाथ डवले आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
