Mumbai-फक्त अजून एक रील… वाढत्या स्क्रोलिंगमुळे मेंदूत होतोय ‘डिजिटल एम्नेशिया’चा लोचा

मुंबई

“फक्त अजून एक रील पाहतो आणि मग फोन बाजूला ठेवतो…” असे म्हणत सुरू झालेले स्क्रोलिंग अनेकदा तासन्‌तास चालते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स, शॉर्ट व्हिडीओ आणि सतत बदलणाऱ्या कंटेंटच्या सवयीमुळे आता नव्या मानसिक समस्येकडे तज्ज्ञांचे लक्ष वेधले जात आहे. या समस्येला “डिजिटल एम्नेशिया” असे म्हटले जाते. म्हणजेच मोबाईल, इंटरनेट किंवा डिजिटल साधनांवर जास्त अवलंबून राहिल्यामुळे मेंदूची माहिती लक्षात ठेवण्याची आणि आठवण्याची क्षमता कमी होणे.

तंत्रज्ञानामुळे माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली असली तरी त्याची किंमत मेंदूला मोजावी लागत असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. एखादा फोन नंबर, वाढदिवस, पत्ता किंवा महत्त्वाची माहिती लक्षात ठेवण्याऐवजी लोक ती थेट मोबाईलमध्ये सेव्ह करतात. परिणामी मेंदू माहिती साठवण्याचे काम कमी करू लागतो.

विशेष म्हणजे रील्स आणि शॉर्ट व्हिडीओंच्या वाढत्या वापरामुळे ही समस्या अधिक गंभीर होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. रील्समधील प्रत्येक व्हिडीओ काही सेकंदांचा असतो. एका मिनिटात अनेक विषय, चेहरे, आवाज आणि दृश्ये मेंदूसमोर येतात. त्यामुळे मेंदूला कोणती माहिती महत्त्वाची आहे आणि कोणती नाही हे ठरवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी एकाग्रता कमी होणे, विस्मरण वाढणे आणि दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *