इस्लामाबाद : सिंधू नदी प्रणाली आणि स्थगित करण्यात आलेल्या सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारत-पाकिस्तान तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या जलसुरक्षेला धोका निर्माण झाल्यास लष्करी कारवाईचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो, असा इशारा दिला आहे.
आसिफ यांनी पाणी हा पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेशी थेट संबंधित आणि अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे सांगितले. सिंधू खोऱ्यातील पाण्यावरील हक्क किंवा उपलब्धतेला गंभीर धोका निर्माण झाल्याची भावना पाकिस्तानला झाली, तर प्रत्युत्तर देण्यास मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये आधीच तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या या वक्तव्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे
