pimpri chinchwad-कुदळवाडीतील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल

पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad)-कुदळवाडीतील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल.डायमंड चौक परिसरात पहाटेची घटना; अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात, कारण अद्याप अस्पष्ट.

चिखलीतील कुदळवाडी परिसरातील डायमंड चौक येथे असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला मंगळवारी (दि. २३) पहाटे भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाचे तब्बल दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरत होती. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागली.
अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र गोदामातील काही ठिकाणी धुमस सुरू असल्याने जवानांकडून आग पूर्णपणे विझविण्याचे काम सुरूच आहे. आग शेजारील परिसरात पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.
या आगीत गोदामातील भंगार साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट, रासायनिक प्रतिक्रिया किंवा अन्य कारणांमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेची चौकशी सुरू असून नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे.
पहाटेच्या वेळी लागलेल्या या आगीमुळे कुदळवाडी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मात्र मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *