पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी चार ठिकाणी धडक कारवाया केल्या. २३ जून रोजी झालेल्या या कारवायांमध्ये हजारो रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला. महिला, अल्पवयीनासह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या दारूबंदी विरोधी पथकासह संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी केली.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्त मंदिर रोडवरील अष्टविनायक कॉलनी येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी विद्या अनिल राठोड (वय ४०, रा. वाकड) ही गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना आढळून आली. तिच्याकडून ३८ लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात दारू पुरवठादार जयश्री राजपूत (रा. साबळेवाडी) हिलाही आरोपी करण्यात आले आहे.
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी येथील इंद्रायणीनगर परिसरात कारवाई करण्यात आली. यामध्ये विक्रम सोळंकी (रा. देहूफाटा) याच्या सांगण्यावरून देशी दारूची विक्री करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथे दारूबंदी विरोधी पथकाने छापा टाकून रामा नाथा हिले (वय २५, रा. रामवाडी) याला देशी दारू विक्री करताना पकडले. चौकशीत हा साठा अंतू शेटे (वय ४०, रा. नवलाख उंबरे) याचा असल्याचे निष्पन्न झाले.
तर उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वराळे येथे गुन्हे शाखा युनिट-४ ने कारवाई करून पृथ्वीराज रामकृष्ण वाळुंजकर (वय २०, रा. वराळे) याला परदेशी दारूच्या साठ्यासह अटक केली. ही दारू विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली.
या सर्व कारवायांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर दारू साठा जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधातील मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा धडक बडगा; चार कारवायांत हजारोंचा मुद्देमाल जप्त वाकड, दिघी, तळेगाव आणि म्हाळुंगे परिसरात कारवाई; महिला, अल्पवयीनासह पाच जणांवर गुन्हे
