Mumbai-आयटी क्षेत्रातील कथित धर्मांतर, मानसिक छळ आणि लैंगिक शोषण प्रकरणांवर विधान परिषदेत चर्चा; विशेष समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : नाशिकमधील टीसीएस आणि पुण्यातील विप्रो कंपनीतील कथित धर्मांतर, मानसिक छळ आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून विधान परिषदेत बुधवारी जोरदार चर्चा झाली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उपस्थित करत आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सुशिक्षित महिलांना लक्ष्य करून धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप केला.

चित्रा वाघ यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे गांभीर्य मान्य केले. अशा घटनांचा सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, समितीच्या अहवालाच्या आधारे आवश्यक असल्यास शासन कायदेशीर सुधारणा करण्यासही तयार आहे. महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही आणि अशा प्रकरणांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या चर्चेनंतर आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *