मुंबई(mumbai) : आषाढी वारी हा वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाचा वारी सोहळा डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून जगभर पोहोचणार असल्याची माहिती दिली.
बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पालखी सोहळा प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालखी सोहळा प्रमुखांनी केलेल्या सर्व मागण्यांनुसार आवश्यक कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. महिला वारकऱ्यांच्या रात्रीच्या मुक्कामासाठी विशेष सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वारकरी आणि भाविकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत हा सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे आवाहन केले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक आणि निवास व्यवस्थांवर विशेष भर देण्यात आला असून राज्य शासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
