मुंबई(mumbai) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जेट्टी प्रकल्पाचे काम पावसाळा संपताच तातडीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिघी मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ काढण्याच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळालेली असतानाही निविदा प्रक्रियेला विलंब होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच जेट्टी परिसरातील गाळ काढण्याची कामेही तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
यावर मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पातील सर्व प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करून पावसाळ्यानंतर कामाला वेग देण्याचे निर्देश दिले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मच्छिमारांना सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासह मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
