पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभ-२०२६ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी देश-विदेशातील विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)च्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय संस्कृती, नैतिकता, करुणा आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करून नेतृत्व करावे, असे आवाहन केले. तसेच सिम्बायोसिसमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी आपल्या देशात ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाचा संदेश पोहोचवावा, असेही त्यांनी सांगितले.
महान संस्था या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वांमुळे घडतात, असे नमूद करत राज्यपालांनी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. एस. बी. मुजुमदार यांच्या कार्याचे कौतुक केले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारावर आधारित सिम्बायोसिसने जगभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणत केवळ शिक्षणच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासाचेही कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
समारंभास सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती प्रा. डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रामन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष हेन्री तेबांडेके तसेच विविध देशांतील विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
