‘MPSC परीक्षा ऑफलाइनच घ्या; ऑनलाइन पद्धतीत स्क्रीन शेअरिंग, क्लोनिंगचे धोके’ – सतेज पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या प्रस्तावावर विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ऑनलाइन परीक्षेमध्ये स्क्रीन शेअरिंग, क्लोनिंग आणि सायबर गैरप्रकारांची शक्यता असल्याने MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

विधानपरिषदेत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य MPSC परीक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह असणे अत्यावश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीत तांत्रिक अडचणींसह गैरप्रकार होण्याचा धोका अधिक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

त्यांनी पुढे सुचविले की, परीक्षा एकाच दिवशी घेण्याऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत चार शिफ्टमध्ये आयोजित केल्या जाऊ शकतात. यामुळे परीक्षेचे नियोजन अधिक प्रभावी होईल आणि उमेदवारांवरील ताणही कमी होईल.

MPSC तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्या या मागणीकडे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *