पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – आईला कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून कामगाराने त्याच्या साथीदारांसह एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याचे अपहरण करून त्यांना पैशांसाठी धमकी देत मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २४ जून) सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास टाटा कंपनीतील कार प्लांट, मटेरियल गेट, पूर्णानगर, चिखली येथे घडली.
विन्सेन्ट जोसेफ डिसील्वा (वय ५७, रा. कोंढवा, पुणे) यांनी २७ जून रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शांताराम तयप्पा शिंदे (रा. नेहरू नगर, पिंपरी), साहिल संदीप घाडगे (वय २२, रा. रुपीनगर, तळवडे), कृष्णा अनंत काळे (वय २१, रा. त्रिवेणीनगर, चिखली) आणि पियुष मधुकर शेंडगे (वय १८, रा. मोरेवस्ती, चिखली) या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या कंपनीतील इतर वरिष्ठ अधिकारी घरी जाण्यासाठी उभे असताना आरोपी दोन मोटारसायकलवरून तेथे आले. आरोपीच्या आईला कामावरून काढल्याचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादीचे अपहरण केले आणि नेहरू नगर येथील घरी घेऊन गेले. तेथे “माझ्या आईला पुन्हा कामावर घे, तसेच माझा पगार वाढव” अशी खंडणीवजा धमकी दिली. फिर्यादींनी कंपनीच्या नियमांचे कारण सांगताच आरोपीने त्यांना मारहाण केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
आईला कामावरून काढल्याच्या रागातून कंपनी अधिकाऱ्याचे अपहरण
