पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठे बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी ११ ते १८ जुलैदरम्यान विविध मार्ग राहणार बंद; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे :
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यात ११ ते १८ जुलैदरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्याचा बंदोबस्त आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. या कालावधीत विविध मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे–सासवड मार्ग बंद :
११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून १३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणेहून सासवडकडे दिवेघाट आणि बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहने खडी मशीन चौक–कात्रज–कापूरहोळ मार्गे वळविण्यात येतील. सासवडहून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे–खेड–शिवापूर मार्गे सोडण्यात येईल.

सासवड–जेजुरी–वाल्हे मार्गावरही बदल :
१३ जुलै पहाटे २ वाजल्यापासून १४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत पुणे–सासवड–जेजुरी–वाल्हे–निरा तसेच निराहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी–पारगाव मेमाणे–सुपे–मोरगाव–निरा या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

वाल्हे–लोणंद टप्प्यात वाहतूक वळविणार :
१५ जुलै रोजी पहाटे २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे–सासवड–जेजुरी–वाल्हे–निरा आणि निराहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना सासवड–जेजुरी–मोरगाव या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.

फलटण–लोणंद वाहतुकीसाठीही पर्यायी मार्ग :
१५ ते १८ जुलैदरम्यान फलटण व लोणंद येथून पुण्याकडे येणारी तसेच पुण्याहून फलटण आणि लोणंदकडे जाणारी सर्व वाहतूक शिरवळ मार्गे वळविण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *